(कर्जत)
पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच, कर्जतजवळील माथेरानमधील प्रसिद्ध शॉर्लेट तलावात तिघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 15 जून रोजी घडली. मृत्यू झालेल्यांमध्ये नवी मुंबईतील सुमित चव्हाण (वय 16), आर्यन खोब्रागडे (वय 19) आणि फिरोज शेख (वय 19) यांचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुमारे 10 जणांचे पर्यटकांचे एक पथक तलावाच्या परिसरात फिरण्यासाठी आले होते. या तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री रेस्क्यू पथक, माथेरान पोलिस आणि नगरपालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
शॉर्लेट तलाव हा माथेरान शहराला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्त्रोत असून या परिसरात पोहण्यास सक्त मनाई आहे. मात्र, अनेक पर्यटक मनाई आदेशांकडे दुर्लक्ष करून तलावात पोहण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून पर्यटकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिकांकडूनही केली जात आहे.
माथेरानमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते. इको पॉइंट, मंकी पॉइंट यांसारख्या ठिकाणांप्रमाणे शॉर्लेट तलाव देखील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात. दस्तुरीपासून चांगभलं मंदिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, त्यामुळे अनेकदा व्यवस्थापनावर ताण येतो.