(संगमेश्वर / एजाज पटेल)
अनोळखी व्यक्तीने आधी विळा मागितला, त्यानंतर भेंडी काढण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला आणि संधी साधत तिच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पलायन केले. संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे बुद्रुक येथील गवळीवाडीत आज (मंगळवारी, ३ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेत सौ. सरीता पांडुरंग वाजे (वय ६७, रा. वांझोळे बुद्रुक, गवळीवाडी) या महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. त्या करंबेळे धावडेवाडी मार्गालगत आपल्या म्हशी चरवत असताना शेतातील चारा काढण्याचे काम करत होत्या. याचवेळी एका अनोळखी इसमाने त्यांच्याजवळ येत विळा मागितला. भेंडीचे दोर काढायचे असल्याचे सांगून त्याने महिलेशी संवाद साधला. महिलेनेही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला विळा दिला.
त्यानंतर संबंधित इसम भेंडी काढण्याचे काम करू लागला. मात्र, त्याचा उद्देश वेगळाच होता. महिलेचे लक्ष विचलित झाल्याची संधी साधून त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. एक लाख रुपये किमतीचा ऐवज घेऊन जवळच उभी केलेली दुचाकी सुरू करत त्याने घटनास्थळावरून पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सरीता वाजे यांना मोठा धक्का बसला.
या प्रकरणी मिळालेल्या फिर्यादीवरून देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरूख पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम ए. पंदेरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शेतात काम करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला विश्वासात घेऊन अशा प्रकारे लुटल्याने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. विळा मागण्यापासून सुरू झालेला प्रकार मंगळसूत्र चोरीपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. एक लाख रुपयांचे मंगळसूत्र घेऊन पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्याचे आव्हान आता देवरूख पोलिसांसमोर आहे.


