(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कणखर इच्छाशक्ती, शारीरिक क्षमता आणि कठोर मेहनतीच्या जोरावर रत्नागिरीच्या दोन सुपुत्रांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रत्नागिरी सायकलिंग क्लब व निश्चयः वेलनेसचे संस्थापक डॉ. नितीन सनगर आणि क्लब व निश्चयःचे सदस्य राहुल भोसले यांनी अत्यंत आव्हानात्मक मानली जाणारी ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ ही आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा अवघ्या ७ तास २ मिनिटांत पूर्ण केली. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन एशिया समितीच्या अंतर्गत आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील ६८ देशांमधून ३,५०० हून अधिक नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तीन कठीण प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेने सहभागी खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहिली.
स्पर्धेतील आव्हानात्मक टप्प्यांमध्ये समुद्राच्या लाटांमध्ये १.९ किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग, तीव्र चढ-उतार असलेल्या खडतर मार्गावर ९० किलोमीटर सायकलिंग आणि कोस्टल रस्त्यांवर २१.१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन धावणे अशा तीन प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेत किरकोळ चूकही पेनल्टी किंवा डीएनएफ (डिड नॉट फिनिश) ठरण्याची शक्यता असते. अशा कठीण परिस्थितीत अचूक नियोजन, सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटीच्या जोरावर डॉ. सनगर व राहुल भोसले यांनी निर्धारित अंतर ७ तास २ मिनिटांत पूर्ण केले.
डॉ. नितीन सनगर यांची चौथी ट्रायथलॉन
डॉ. नितीन सनगर यांची ही एकूण चौथी ट्रायथलॉन स्पर्धा होती. ७०.३ फॉरमॅटमधील ही त्यांची तिसरी, तर अधिकृत ‘आयर्नमॅन’ म्हणून पहिलीच स्पर्धा ठरली. यापूर्वी त्यांनी २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरचे सुपर रँडोनियर सायकलिंगचे कठीण टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. तसेच सलग तीन वर्षे ‘टाटा फूल मॅरेथॉन’ आणि सलग तीन वर्षे ‘सातारा हिल मॅरेथॉन’ पूर्ण केली आहे. नुकत्याच झालेल्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये त्यांनी ‘सब २’ वेळेसह सुवर्णपदकही पटकावले आहे. त्यांच्या या क्रीडा प्रवासात कोल्हापूर येथील ‘अर्हता’चे पंकज राउळू यांचे मोलाचे प्रशिक्षण लाभले.
राहुल भोसले यांचीही उल्लेखनीय कामगिरी
राहुल भोसले यांनी यापूर्वी दुबईच्या खोल समुद्रातील १० किलोमीटर ‘ओशन मॅन’ ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धा, ‘लोह पुरुष’ मालवण येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा तसेच अनेक मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘गोवा आयर्नमॅन ७०.३’ स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी डॉ. नितीन सनगर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केला होता.
पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा तीनही प्रकारांमध्ये शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावणारी ही जागतिक दर्जाची स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉ. नितीन सनगर आणि राहुल भोसले यांनी रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या कामगिरीचे क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून कौतुक होत असून दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


