(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ची स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करण्यासाठी राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेची संकल्पना, रत्नागिरी जिल्ह्याची वैशिष्ट्ये आणि कोकणचा समृद्ध वारसा यांचे प्रतिबिंब लोगोमध्ये उमटावे, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील विद्यार्थी, कलाकार, ग्राफिक डिझायनर्स आणि कल्पक नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
या लोगोमध्ये रत्नागिरीची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वैशिष्ट्ये सर्जनशील पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामध्ये अथांग अरबी समुद्र आणि विपुल सागरी संपदा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा व समृद्ध निसर्ग, जागतिक कीर्तीचा हापूस आंबा, शेती-बागायती, पारंपरिक व आधुनिक मत्स्यव्यवसाय, पर्यटन, कोकणी संस्कृती व वारसा यांचा समावेश असावा. त्याचबरोबर स्थानिक उद्योजकता, रोजगारनिर्मिती, शाश्वत विकास आणि प्रगती या संकल्पनाही लोगोमधून प्रभावीपणे व्यक्त होणे अपेक्षित आहे.
विजेत्याला १० हजारांचे रोख पारितोषिक
स्पर्धेतून सर्वोत्तम लोगोची निवड करण्यात येणार असून प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १० हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्याची ओळख, योजनेची संकल्पना आणि नाविन्यता या निकषांवर एकूण १०० गुणांच्या आधारे तज्ज्ञ समितीकडून प्रवेशिकांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी महत्त्वाच्या अटी व नियम
लोगो तयार करण्यासाठी कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच नक्कल (Plagiarism) आढळल्यास संबंधित प्रवेशिका तत्काळ बाद करण्यात येईल. लोगो पूर्णपणे स्वयंनिर्मित आणि रंगीत स्वरूपात स्पष्ट दिसणारा असणे आवश्यक आहे.
निवडलेला लोगो सोशल मीडिया, संकेतस्थळ, पत्रव्यवहार, फलक आणि बॅनर अशा विविध माध्यमांवर लहान-मोठ्या आकारात सहज वापरता येण्याजोगा असावा. लोगोमध्ये राजकीय चिन्हे, व्यक्तींचे छायाचित्र, धार्मिक किंवा आक्षेपार्ह बाबी तसेच भारत किंवा महाराष्ट्र शासनाची अधिकृत राजमुद्रा अथवा तिची नक्कल वापरण्यास मनाई आहे. निवडलेल्या लोगोचे सर्व कॉपीराइट्स आणि बौद्धिक संपदा अधिकार ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती, रत्नागिरी’ यांच्याकडे राखीव राहतील. यासंदर्भात समितीचा निर्णय अंतिम असेल.
प्रवेशिका पाठविण्याची पद्धत आणि अंतिम मुदत
स्पर्धकांनी आपला लोगो JPG किंवा PNG स्वरूपात सादर करावा. शक्य असल्यास त्यासोबत Vector, CorelDRAW, EPS किंवा PDF फाईलही जोडावी. याशिवाय लोगो तयार करण्यामागील विचार आणि संकल्पना स्पष्ट करणारी १०० ते १५० शब्दांची संकल्पना टिपण (Concept Note) जोडणे अनिवार्य आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ई-मेल किंवा प्रत्यक्ष स्वरूपात पाठवाव्यात. ई-मेलसाठी dporatnagiri@gmail.com हा पत्ता असून, प्रत्यक्ष प्रवेशिका जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मुख्य प्रशासकीय इमारत, रत्नागिरी – ४१५ ६१२ या पत्त्यावर सादर कराव्यात.
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’साठी आपल्या कल्पकतेतून आणि कलात्मक कौशल्यातून वैशिष्ट्यपूर्ण लोगो साकारण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून कलाकार आणि डिझायनर्सना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक इच्छुकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


