(जळगाव)
एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. शेतातील लोखंडी तारेच्या कुंपणामध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एका कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या घटनेत दीड वर्षांची मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. ही दुर्घटना बुधवारी (२० ऑगस्ट) सकाळच्या सुमारास घडली.
पावरा कुटुंब शेतात कामासाठी निघाले होते. मात्र, त्यांना शेताभोवती घातलेल्या लोखंडी कुंपणात विद्युत प्रवाह सोडलेला आहे, याची कल्पनाही नव्हती. शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी हे कुंपण उभारले होते आणि त्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू ठेवलेला होता. कुंपणाला स्पर्श होताच विजेचा तीव्र धक्का बसला आणि पाचही जण जागीच कोसळले. या हृदयद्रावक घटनेत विकास पावरा (वय ३५), पत्नी सुमन (३०), लहान मुलगा पवन, मुलगी कंवल आणि एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या कुटुंबातील दीड वर्षांची चिमुरडी दुर्गा पावरा मात्र चमत्कारिकरित्या वाचली. हीच मुलगी आता संपूर्ण घटनेची साक्षीदार ठरत आहे.
घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. काही तासांतच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, तहसीलदार प्रदीप पाटील आणि वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून घटनास्थळाचा तपास सुरू केला.
प्राथमिक तपासातून हे समोर आले आहे की, वीज प्रवाह शेतात अनधिकृतपणे सोडण्यात आला होता. शेतकऱ्याने यासाठी कोणतीही सुरक्षितता बाळगलेली नव्हती. त्यामुळे हा प्रकार निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार मानला जात आहे. यामुळे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
या संपूर्ण घटनेमुळे वरखेडी गावात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे एकाचवेळी जाणे हे गावासाठीही धक्कादायक आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, अशा निष्काळजी शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, विजेच्या तारेचा पुरवठा कुठून व कसा केला गेला, या मागचं संपूर्ण नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. वीज वितरण कंपनीच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे. अपघात की घातपात, याची सखोल चौकशी सुरू असून, मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा, यासाठी पोलीस यंत्रणा आणि प्रशासन प्रयत्नशील आहे.
या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की, शेतांभोवती विद्युत प्रवाह असलेलं कुंपण घालणं हे केवळ अनधिकृतच नाही, तर जीवघेणंही ठरू शकतं. शासनाकडून अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर कायदे आणि नियंत्रण व्यवस्था लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

