(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुखजवळील सायले येथील चंद्रभागा स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या देवरुख व पाटगाव केंद्रांतील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आणि पुस्तक प्रकाशन समारंभ देवरुख येथील मराठा भवनमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे १२० गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
देवरुख व पाटगाव केंद्राचे माजी केंद्रप्रमुख तसेच चंद्रभागा स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अभिमन्यू रामचंद्र शिंदे यांनी आपल्या सेवाकाळात या दोन्ही केंद्रांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेल्या यशाचे कौतुक व्हावे, त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यात डॉ. अभिमन्यू शिंदे लिखित ‘अशी मने असे नमुने’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाचे प्रकाशन हे विशेष आकर्षण ठरले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहनजी बने, देवरुखच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, तालुक्यातील युवा नेतृत्व प्रद्युम्न माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. परीट साहेब, प्रसिद्ध गझलकार देविदास पाटील आणि खेड येथील कवयित्री रूपाली पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश सावंत यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणारा हा सोहळा उपस्थितांसाठी आनंददायी ठरला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव आणि साहित्यनिर्मितीचा सन्मान अशा दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा संगम या कार्यक्रमातून साधण्यात आला. या सोहळ्याला देवरुख आणि परिसरातील शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर पवार व समीर मोहिते यांनी केले, तर संस्थेचे सचिव श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


