(यवतमाळ)
दारव्हा शहरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून चार बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत बालकांची नावे अशी : रिहान असलम खान (13), गोलू पांडुरंग नारनवरे (10), सोम्या सतीश खडसन (10), वैभव आशीष बोधले (14) हे सर्व मुलं दारव्हा येथील रहिवासी होते.
घटनेचा तपशील
दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांना पाण्याची खोली आणि धोक्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.
घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जखमी मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजीवनी रुग्णालय, यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौघांना मृत घोषित केले. चारही मृत बालकांचे मृतदेह पुढील तपासासाठी पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पुढील कारवाई सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. खुल्या खड्ड्याभोवती कुठलीही सुरक्षितता, फित, सूचना फलक किंवा अडथळा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी ठेकेदार व संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

