( मुंबई )
राज्यात जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. जून 2026 मध्ये राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 34 ठिकाणी छापे टाकून तब्बल 4.12 कोटी रुपयांची बेकायदा औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 जणांना अटक करण्यात आली आहे.
एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, विनापरवाना औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या 15 ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. या धाडीत 2.32 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय, दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींप्रकरणी 8 ठिकाणी कारवाई करून 2.27 लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली. तर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांवरील 3 कारवायांमध्ये 33.26 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच वैद्यकीय उपकरण नियमांतर्गत 1.26 कोटी रुपयांच्या साहित्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले.
787 नमुन्यांची तपासणी; 35 औषधे निकृष्ट
जून महिन्यात एफडीएने 787 औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे नमुने तपासले. त्यापैकी 752 नमुने दर्जेदार, तर 35 नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले. निकृष्ट ठरलेल्या सर्व बॅचची विक्री आणि वितरण तातडीने बंद करण्याचे तसेच बाजारातून ‘रिकॉल’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित उत्पादक, वितरक आणि परवानाधारकांविरोधात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या उत्पादनांचा समावेश
निकृष्ट दर्जाचे आढळलेल्या उत्पादनांमध्ये पुढील वस्तूंचा समावेश आहे:
- सनस्क्रीन लोशन
- कुंकू
- आयुर्वेदिक औषधे
- पॅरासिटामोल
- अँटिबायोटिक्स
- अॅस्पिरिन
- कफ सिरप
- शॅम्पू
- मेकअप फिक्सर स्प्रे
तुकाराम मुंढे यांचे नागरिकांना आवाहन
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा बेकायदा औषध विक्रीबाबतची माहिती तातडीने FDA च्या टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 वर द्यावी. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात यापुढेही राज्यभर अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

