( नवी दिल्ली )
मिडल ईस्टमधील युद्धजन्य परिस्थिती, होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव आणि जागतिक इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांच्या समुद्र परिसरात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला असून भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हिडिओ शेअर करत या शोधाची माहिती दिली. सरकारी मालकीच्या Oil India Limited (OIL) कंपनीने अंदमानच्या ऑफशोअर बेसिनमध्ये नैसर्गिक वायूचे साठे शोधल्याचे त्यांनी सांगितले.
अंदमानच्या समुद्रात 1900 मीटर खोलीवर वायू सापडला
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमान आणि निकोबार बेटांपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावरील ‘श्री विजयपुरम-3’ या विहिरीत नैसर्गिक वायूचे अस्तित्व आढळले आहे. ही विहीर समुद्रात सुमारे 1900 मीटर खोलीवर असून प्राथमिक चाचण्यांमध्ये वायू सतत जळताना दिसल्याने नैसर्गिक वायू असल्याची पुष्टी झाली आहे. वायूचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्याचा सविस्तर अभ्यास सुरू आहे.
भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे पाऊल
भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी जवळपास 85 टक्के आणि नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे 70 टक्के आयात करतो. त्यामुळे जागतिक तणाव, युद्ध किंवा पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा भारतावर थेट परिणाम होतो. इराण-अमेरिका-इस्त्रायल तणावामुळे कच्चे तेल आणि गॅस पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला असताना अंदमानमध्ये सापडलेला हा वायू साठा भारतासाठी ‘एनर्जी जॅकपॉट’ मानला जात आहे. यामुळे भविष्यात भारत इंधनाच्या बाबतीत अधिक आत्मनिर्भर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंदमान खोरे भारतासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकते
अंदमान आणि निकोबार खोरे अनेक वर्षे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र सरकारच्या ‘ओपन एकरेज लायसन्सिंग पॉलिसी’ (OALP) अंतर्गत सुमारे 10 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र संशोधनासाठी खुले करण्यात आले. भूगर्भशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, या परिसरात सुमारे 37.1 कोटी टन तेल समतुल्य (mmtoe) ऊर्जा संसाधने असू शकतात. त्यामुळे अंदमान खोरे हे भारतातील सर्वात आशादायक सागरी ऊर्जा क्षेत्रांपैकी एक मानले जात आहे.
OIL आणि ONGC कडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम
2026 पासून Oil India Limited आणि Oil and Natural Gas Corporation (ONGC) या दोन सरकारी कंपन्या अंदमान समुद्रात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवत आहेत. OIL (Oil India Limited) ने विजयपुरम-1, विजयपुरम-2 आणि विजयपुरम-3 अशा तीन विहिरी खोदल्या आहेत. विजयपुरम-2 मध्ये 2212 ते 2250 मीटर खोलीवर 87 टक्के मिथेनयुक्त वायू आढळल्याची पुष्टी झाली आहे. मात्र विजयपुरम-1 ही विहीर कोरडी निघाली. दुसरीकडे ONGC ने ‘AND-P1’ या अति-खोल समुद्री विहिरीवर काम सुरू केले आहे. कंपनीचे उद्दिष्ट समुद्रसपाटीपासून 6000 मीटर खोलीपर्यंत खोदकाम करण्याचे असून सध्या 4000 मीटरपर्यंत ड्रिलिंग पूर्ण झाले आहे.
अंदमानमध्ये वायू उत्पादन सुरू होण्यासाठी लागू शकतात 6 ते 10 वर्षे
तज्ज्ञांच्या मते, अंदमान समुद्रातील वायू साठ्यांचा शोध लागणे ही मोठी गोष्ट असली तरी प्रत्यक्ष व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यासाठी अजून बराच काळ लागू शकतो. अति-खोल समुद्रात खोदकाम करणे हे अत्यंत अवघड आणि खर्चिक काम मानले जाते. समुद्राखाली पाइपलाइन नेटवर्क उभारणे, गॅस द्रवीकरण प्रकल्प तयार करणे आणि मुख्य भूभागावर सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही मोठी पायाभूत आव्हाने आहेत. विश्लेषकांच्या अंदाजानुसार, शोधापासून व्यावसायिक उत्पादनापर्यंतची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 6 ते 10 वर्षे लागू शकतात.

