(पुणे)
मे महिन्यापासून पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालया अंर्तगत खूनाच्या आणि गुन्हेगारी घटना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्यात, बुधवारी (ता. १३) दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एक खुनाची घटना घडल्याचे समोर आले आहे.
चऱ्होली फाटा येथील एका प्रोटीन शॉपमध्ये, ओळखीतील तरुणाला जिम ट्रेनर असलेल्या तरुण-तरुणीने लोखंडी रॉड आणि पहारीने हल्ला करत निर्घृण खून केला. घटना झाल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणीवर मृतकाने त्रास दिल्याच्या कारणास्तव हा खून केला. या भीषण हल्ल्यामुळे प्रोटीनच्या दुकानातील भिंती आणि जमिनीवरही रक्त सांडले होते.
लल्ला उर्फ गोपीनाथ वरपे असे हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर आरोपी प्रांजल आणि यश पाटोळे यांचं दोघांमध्ये चऱ्होली येथे प्रोटीन पावडरच दुकान आहे. बुधवारी दुपारी हत्या झालेला लल्ला वरपे तिथे आला. तो प्रांजल ला अश्लीलरित्या बोलत होता. यावेळी दोघांमध्ये शाब्दीक वादही झाला. लल्लाने या वादातून शिवीगाळ केली, यावरून प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी लल्लाला पोलिसांनी रुग्णालयात नेले, पण त्याला झालेल्या अति रक्तस्त्रावामुळे उपचारादरम्यान तो मृत झाला.
हल्ल्यानंतर आरोपी तरुण-तरुणी दोघेही थेट पोलिस ठाण्यात हजर झाले आणि घडलेली घटना पोलिसांना सांगितली. दिघी पोलिसांनी आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आज (गुरुवार) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

