(यवतमाळ)
जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना घेऊन जाणारी ट्रॅव्हलर आणि भरधाव ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १० ते १२ शिक्षक जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. ही दुर्घटना २० ऑगस्ट रोजी बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास, घाटंजी–पांढरकवडा मार्गावर घाटंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर रसिकाश्रय संस्थेजवळ घडली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, ट्रॅव्हलरचा अक्षरशः चुराडा झाला. शिक्षकांना घेऊन जाणारी ट्रॅव्हलर (MH 30 AA 5602) यवतमाळहून अर्ली–भीमकुंड मार्गावर जात असताना, समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (AP 01 V 8282) तीला जबर धडक दिली. ट्रकचा वेग प्रचंड असल्याने ट्रॅव्हलरचा समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि सर्व प्रवासी शिक्षक या धडकेत गाडीबाहेर फेकले गेले.

या अपघातात अभिजित बनसोड, नितीन राठोड, दीपक पाथरडकर आणि विवेक मोरस्कर हे शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींमध्ये रत्नमाला नैताम, रितेश वाघाडे, मानीबाई गिनगुले यांच्यासह अन्य शिक्षकांचा समावेश असून, त्यांना घाटंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रॅव्हलर चालक देखील या अपघातात जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या दुर्दैवी दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक हे दररोज दूरवरच्या शाळांमध्ये जाण्यासाठी अशा प्रकारच्या ट्रॅव्हलरवर अवलंबून असतात. मात्र वाहतुकीच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष आणि अतिवेगाच्या घटनांमुळे अशा दुर्घटना वारंवार घडताना दिसत आहेत.

