वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीकडून बडतर्फ केल्यानंतर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळत जामीन मंजूर करण्यात आला आहे. यानंतर खेडकर यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येत आपल्या विरोधातील आरोपांवर थेट आणि सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रिया देत असताना पूजा खेडकर यांनी आत्मविश्वासाने सांगितलं की, आपल्या मेहनतीमुळे मिळालेलं यश तात्पुरतं हरवलं असलं तरी अंतिमतः सत्य आणि न्यायच विजयी होईल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
“माझ्याविरोधात नकारात्मक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं”
पूजा खेडकर म्हणाल्या, “माझ्याविरोधात हेतुपुरस्सर नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं आणि त्यात निवडक नकारात्मक पुरावे जोडण्यात आले. माझ्या क्षमतेवर शंका घेण्यासाठी माझ्या त्रुटींचं भांडवल करण्यात आलं. मी काही चुकीचं केलं नाही. मला पूर्ण विश्वास आहे की मला पुन्हा माझं पद बहाल केलं जाईल. मी पुन्हा आयएएस होईन. माझं यश माझ्या मेहनतीमुळे होतं, आणि ते मला पुन्हा मिळवता येईल.”
“संत्रं खाल्लं म्हणून मेमो दिलं गेला”
मसुरीतील प्रशिक्षणादरम्यान आठ वेळा मेमो मिळाल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना खेडकर म्हणाल्या, “मेमो म्हणजे काय? तिथं एखादी किरकोळ चूक झाली तरी मेमो मिळतो. मला संत्रं खाल्लं म्हणूनही मेमो देण्यात आला होता. उशिरा येणं, लहानशा गोष्टींसाठी नोटीस बजावली जाते.”
दिव्यांग प्रमाणपत्रासंबंधी स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “माझा दृष्टीदोष आहे, मी पूर्ण अंध नाही. माझा नंबर मायनस १२ आहे. भविष्यात माझी दृष्टी पूर्ण जाऊ शकते, अशी वैद्यकीय शक्यता आहे. मात्र मी ही गोष्ट लपवली कारण कमतरतेमुळे क्षमतेवर शंका घेतली जाऊ शकते.”
माध्यमांपासून दूर राहण्यामागचं कारण स्पष्ट करताना खेडकर म्हणाल्या, “मी आधी कधीच माध्यमांसमोर आले नव्हते. मला वाटलं की माझ्या बाजूने उत्तर न्यायालयातूनच जाईल. मला न्याय मिळेल, हाच विश्वास होता आणि आहे. युपीएससीकडून आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी आरोप केला की, “युपीएससीने सर्व माहिती नीट पडताळली नाही. त्यांच्या तपासामध्ये त्रुटी होत्या.”
पूजा खेडकर यांची नियुक्ती पुणे कलेक्टर ऑफिसला प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर काही आरोप झाले. त्यावर बोलताना ज्या गोष्टी माझ्याबद्दल दाखवण्यात आल्या, त्या चुकीच्या होत्या. उलट कलेक्टर ऑफिसमध्ये मला पहिल्या दिवसापासून त्रास देण्यात आला. सुरूवातीला सांगितलं गेलं की, मी एक कॅबिन मागितले. पण हे कसं शक्य आहे. मी फक्त विचारलं होते की, मला कुठे बसायचं आहगे असंही त्या म्हणाल्या.
माझ्या गाडीला जो लाल दिवा लावला होता तो काय मी कोणत्या दुकानात जाऊन खरेदी केला होता का? मला तो लाल दिवा पुणे कलेक्टर ऑफिसमधूनच मिळाला होता. तसंच, पूजा म्हणाल्या की, मी कोणतंही माझं नाव बदललं नाहीये. मी फक्त माझ्या नावासोबत आईचं नाव लावलं. माझं नाव पूजा दिलीपराव खेडकर आहे. मी फक्त पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर केलं. यामध्ये चुकीचे काय आहे? असंही त्या म्हणाल्या आहेत.