(पुणे)
हॉलमार्क म्हणजे दागिन्यांवरील विश्वासाचा शिक्का मानला जातो. मात्र, वारजे परिसरातील दोन भावांनी याच विश्वासाला सुरुंग लावत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १५ हून अधिक सराफांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बनावट पावत्या, खोटे हॉलमार्क आणि ४ कॅरेटच्या सोन्यावर फक्त सोन्याचा मुलामा देऊन तयार करण्यात आलेल्या दागिन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली. चमकदार आणि हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचा खरा सोन्याचा प्रमाण अवघा २० टक्के असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या फसवणुकीची पहिली घटना फुरसुंगीतील विक्रम ढोकले यांच्या सराफ दुकानात उघडकीस आली. आरोपांनी १३.३६ ग्रॅम वजनाच्या साखळीवर २२ कॅरेट हॉलमार्क असल्याचा दाखला देत ८० हजारांचे कर्ज उचलले. काही दिवसांतच इतर नऊ सराफ दुकानांतही त्यांनी हीच पद्धत वापरून फसवणूक केली. आंबेगाव, चंदननगर, काळेपडळ पोलीस ठाण्यांतही तक्रारी दाखल झाल्या असून, शहरात एकूण १५ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र, आरोपी अद्यापही मोकळेच आहेत.
गरजू असल्याचे भासवून गहाणदारी; कागदपत्रे बनावट
आरोपी स्वतःला गरीब आणि गरजू दाखवत सराफांकडे दागिने गहाण ठेवत होते. त्या बदल्यात खोट्या पावत्या, बनावट हॉलमार्क व सोन्याचा रंग वापरून विश्वास संपादन केला जात होता. हडपसरमधील चिंतामणी नगर येथे ‘हनुमान ज्वेलर्स’मध्येही अशीच फसवणूक झाली. याठिकाणी तब्बल २.२५ लाख रुपयांची फसवणूक झाली. सराफ नरपतसिंग हेमसिंग देवरा (४०, रा. हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
दोन वेळा गहाण; दोन्ही वेळा फसवणूक
तक्रारीनुसार, आरोपी अजय पवार याने १७.७५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन गहाण ठेवून एक लाख रुपये रोख घेतले. त्यानंतर तोच पुन्हा मित्र अक्षय धुमाळ याच्यासह दुकानात आला आणि १९.३७ ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट ठेवून २ लाखांची मागणी केली. शक्य तेवढे परीक्षण करून दुकानाने १.२५ लाख रुपये दिले. यावेळी खरेदी पावती मागितली असता पावती हरवली असल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली. शंका आल्याने दोन्ही दागिन्यांची मशीन तपासणी करण्यात आली आणि ते बनावट असल्याचे उघड झाले.
या प्रकारांमुळे सराफ व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. सर्व ठिकाणी तपास सुरू असून आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत.

