(पालघर)
पालघरच्या पूर्व पट्टयातील १२ शिकाऱ्यांचा समूह रानडुकरांच्या शिकारीसाठी जंगलात गेला होता. त्यातील बंदूकधाऱ्याने अंधारात आपल्या सहकाऱ्यालाच डुक्कर समजून गोळी घातली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना २९ जानेवारी रोजी रात्री घडली होती. रमेश वरठा (वय ६०) असे मृताचे नाव आहे. रमेश ठार झाल्याने घाबरलेले त्याचे सहकारी त्याचा मृतदेह घटनास्थळी टाकून पळून गेले होते. मनोर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
पालघर तालुक्यातील पूर्वपट्टयातील बोरशेती, किराट, रावते या गावांतील शिकारी अलन डोंगरावर रानडुकरांच्या शिकारीसाठी गेले असताना ही घटना घडली. डोंगराच्या पायथ्याशी एका पाणवठ्यावर बिबळे, डुक्कर, हरीण, आदी प्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याने ते सावज टिपण्यासाठी दबा धरून बसले होते. यावेळी रमेश वरठा अंधारातून दबक्या पावलाने पाणवठ्याच्या दिशेने येत होते.
झाडावर बसलेल्या बंदूकधाऱ्याला सावजाची चाहूल लागली. अंधारात रमेश न दिसल्याने प्राणी समजून शिकाऱ्याने गोळी झाडली. ती गोळी आपल्याच सोबतच्या माणसाला लागल्याचे लक्षात येऊनही बंदुकधाऱ्याने जखमीला रुग्णालयात नेण्याऐवजी घाबरून तेथून पळ काढला. रमेश वरठा यांची पत्नी अमिता वरठा यांनी २९ जानेवारी रोजी पती घरी परत आले नसल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी डोंगर भागात शोध घेतला असता रमेश यांचा मृतदेह सापडला.