(चिपळूण)
चिपळूण–कराड रस्त्यावर पिंपळी केनॉल परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील थार गाडीने रिक्षाला मागून धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या तिघेरी अपघातात थार, रिक्षा आणि ट्रक यांचा समावेश होता. मृतांमध्ये रिक्षातील चौघे आणि थारचा चालक यांचा समावेश आहे.
अपघाताची भीषणता : जागीच चौघांचा मृत्यू, एकाचा उपचारादरम्यान अंत
प्राथमिक माहितीनुसार, हरियाणा पासिंगची थार गाडी भरधाव वेगात होती. चालकाने नियंत्रण गमावल्याने थारने आधी रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यानंतर रिक्षा ट्रकला जाऊन आदळली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले.

मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश
या दुर्घटनेत रिक्षामधील एका लहान मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपळी नुराणी मोहल्ला येथील रहिवाशांचा या घटनेत समावेश असल्याचे समजते.
या अपघातात शबाना मियां सय्यद (वय 50), हैदर नियाज सय्यद, (3 वर्ष 8 महिने), नियाज हुसेन सय्यद, (वय 50), रिक्षा चालक इब्राहिम इस्माईल लोणी, (वय 60), या चौघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याचे समजते आहे. हे चारहीजण पिंपळी मोहल्ला येथील आहेत. यामध्ये रिक्षा चालक वगळता कुटुंबातील तिघांचाही समावेश असून आई-वडील व मुलगा या तिघांचाही दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झाला आहे. थार गाडी चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. त्याची ओळख पाठविण्याच काम सुरू आहे.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच तात्काळ चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. बेले, पोलीस निरीक्षक श्री. मेंगडे आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाल आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिक व पोलिसांकडून या ठिकाणी मदतकार्य सुरू होतं. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
थारमध्ये महिलेला जबरदस्तीने नेले जात होते? खेर्डी येथे केली सुटका
दुर्घटनेनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, थारमधून एका महिलेला जबरदस्तीने नेली जात होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. “वाचवा, वाचवा” असा तिचा आर्त आवाज ऐकून नागरिकांनी खेर्डी येथे थार थांबवून महिलेची सुटका केली. हा प्रकार अपहरणाशी संबंधित असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलीस तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते. थार चालक कोण होता, महिला कोण आहे, आणि अपघाताच्या पाठीमागील नेमका संदर्भ काय आहे, याचा तपास सुरू आहे. अपघातातील जखमींवर उपचार करण्याचे काम सुरू आहे.

