(सातारा)
कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या परभणीच्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२९ जून) घडली. योगेश्वरी निटुरे (मूळ रा. परभणी) असे मृत तरुणीचे नाव असून ती मलकापूर (ता. कराड) येथील आगाशिवनगर भागात वास्तव्यास होती. सुरुवातीला तिच्या मृत्यूची नोंद अपघात म्हणून करण्यात आली होती, मात्र पोलिस तपासात हा प्रकार आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
योगेश्वरी एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर असून तिची आई तिच्यासोबत आगाशिवनगरमधील इमारतीत राहत होती. रविवारी सकाळी योगेश्वरी इमारतीवरून पडून गंभीर जखमी झाली. तातडीने तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीमधून आत्महत्या असल्याचे स्पष्ट
सुरुवातीला हा अपघात समजून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान संबंधित इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर योगेश्वरीने जाणूनबुजून इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तारू यांनी सांगितले की, “तिने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते. मात्र, आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.”
या घटनेमुळे योगेश्वरीच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

