(मुंबई)
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना, आगामी काही दिवसांमध्येही अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सर्व जिल्हा प्रशासनांना शेती, फळबाग आणि मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात विशेष सतर्कता आवश्यक
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी पूरस्थिती उद्भवण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागांमध्ये पूर्वतयारी करत सतर्कता बाळगावी, असे निर्देश मंत्री जाधव-पाटील यांनी दिले आहेत.
तत्काळ मदत आणि पंचनाम्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश
“शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी यासाठी प्राथमिक पंचनामे तातडीने करावेत आणि त्याचे अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे त्वरेने पाठवावेत,” असेही मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.
NDRF-SDRF पथक सज्ज; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्टवर
राज्यातील विविध भागांत पावसामुळे पूरजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता NDRF आणि SDRFच्या पथकांना सज्जतेच्या स्थितीत ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक यंत्रणांशी समन्वय राखून बचाव व मदत कार्यावर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील अतिवृष्टीमुळे संभाव्य नुकसानीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी राज्य शासन सज्ज असून, शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी कठोर आणि स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

