(दापोली / प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे शिर्दे (ता. दापोली) येथील चिरेखाणीच्या जागेत उभारलेल्या गोडावूनचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी फोडून तब्बल १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना १० ऑगस्टच्या सकाळी १०.३० वाजल्यापासून १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या दरम्यान घडल्याचे उघड झाले आहे.
फिर्यादी प्रदीप गणपत जामसुदकर (वय ४०, रा. शिवाजीनगर, साखळोली, ता. दापोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गोडावूनमधून चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून प्रवेश केला व चिरेखाणीच्या कामासाठी लागणारे विविध मौल्यवान साहित्य चोरून नेले. चोरट्यांनी घेतलेला माल १५ एच.पी. क्षमतेच्या ४ मोटारी, कटरचे २ एक्सेल, ४ डायमंड कटर, २०० मीटरची आर्ममोर्ड केबल व तांब्याच्या २०० मीटर लांबीच्या २ रिमोट केबल्स असा होता, ज्याची एकूण किंमत १,९५,००० रुपये आहे.
या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. १५३/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात कारवाई सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

