(दापोली-रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील गावतळे येथील अत्यंत पुरातन व ८४ गावांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री झीलाई देवी मंदिरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १२) रात्री घडली. मंदिर परिसर व गाभाऱ्यातील एकूण १४ पितळी घंटा चोरून नेण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास मंदिराचे पुजारी बाळकृष्ण गुरव हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात आले असता, घंटा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर गावकरी मोठ्या संख्येने मंदिरात जमा झाले. पाहणीअंती चोरट्यांनी ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी मंदिराच्या पायऱ्यांजवळील पहिली घंटा, गाभाऱ्यात प्रवेशद्वारापूर्वी लटकवलेली सुमारे १५ किलो वजनाची मोठी घंटा, तसेच दैनंदिन पूजेसाठी वापरली जाणारी छोटी घंटा (घाट) लंपास केली आहे. याशिवाय एकत्र बांधलेल्या घंटा तसेच शेजारील श्री मानाई देवी मंदिरातील समोरील व आतील तीन घंटा असा एकूण १४ घंटांचा ऐवज चोरीला गेला आहे. मोठी घंटा काढण्यासाठी चोरट्यांनी खुर्चीचा आधार घेतल्याचे घटनास्थळी आढळलेल्या खुणांवरून स्पष्ट होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल होऊन झीलाई देवी मंदिर, मानाई देवी मंदिर तसेच नजीकच्या स्मशानभूमी परिसराची कसून पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना यादव यांनी सांगितले की, चोरीच्या या घटनेचा तपास सर्व बाजूंनी सुरू असून सोमवारी शेजारच्या गावात भरलेल्या आठवडा बाजाराच्या अनुषंगानेही संभाव्य धागेदोरे तपासले जात आहेत.
गावतळे येथील श्री झीलाई देवी मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून मुंबई, पुणे तसेच संपूर्ण कोकणातून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामस्थांना मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या तसेच गावात येणाऱ्या अनोळखी फेरीवाल्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. या चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये अस्वस्थता व संतापाचे वातावरण असून चोरट्यांचा तातडीने छडा लावण्याची जोरदार मागणी होत आहे.

