( दापोली / प्रतिनिधी )
कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवारातर्फे यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, संगमेश्वर आणि लांजा या पाच तालुक्यामधील १६ गावातील ६०० शेतकऱ्यांना पावसाळी हंगामासाठी मोफत भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. परिवारातर्फे गेली अकरा वर्षे सातत्याने हा उपक्रम विविध गावांमध्ये राबविला जातो.
यावर्षी या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील केळशी, किन्हळ, आगरवायंगणी, आसूद, वाघीवणे, माथेगुजर, रुखी, आघारी, चिखलगाव, कोळबांद्रे, मंडणगड तालुक्यातील वेरळ, खेड तालुक्यातील देवघर, तिसंगी, संगमेश्वर तालुक्यातील देवरुख आणि लांजा तालुक्यातील खानवली या गावांमध्ये भाजीपाला बियाण्याचे वाटप करण्यात आले. यातील किन्हळ, रुखी, आघारी, चिखलगाव, वेरळ आणि देवघर या गावांमध्ये कुणबी सेवा संघाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. उर्वरित गावांमध्ये संस्थेचे आजीव सभासद व प्रतिनिधी मार्फत बियाणे वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला.
परसबागेत भाजीपाला तयार करण्यासाठी अत्यंत कमी प्रमाणात बियाणे लागते आणि एवढ्या कमी प्रमाणात बियाणे बाजारात उपलब्ध होत नसते. यावर उपाय म्हणून अगदी छोट्या प्रमाणात भाजीपाला बियाणे वाटपाची संकल्पना नवभारत छात्रालय परिवारातर्फे कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या प्रेरणेने राबविण्यात आली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांनी पुढाकार घेतला. गेली अकरा वर्षे हा उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविला जात आहे.
या उपक्रमामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाला जातींच्या बियाण्यांचा समावेश करण्यात आला. एका पाकिटात पडवळ (कोकण श्वेता) ८ बिया, कारली (कोकण तारा) १० बिया, भोपळा (सी एम १४ ) ८ बिया, भेंडी (कोकण भेंडी) २२ बिया, शिराळी (कोकण हरिता) ८ बिया, काकडी (शीतल) १६ बिया, आणि दुधी भोपळा (नगडी स्थानिक) ६ बिया व चिबूड (कोकण मधुर) ६ बिया या भाजीपाल्याच्या बिया समाविष्ठ करण्यात आल्या. यासोबतच लागवडीच्या तांत्रिक माहितीचे पत्रकही शेतकऱ्यांना पुरविण्यात आले. या उपक्रमात एकूण ६०० शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत कार्यान्वित असलेल्या भाजीपाला सुधार योजनेचे प्रमुख डॉ.प्रकाश सानप यांनी या उपक्रमासाठी भाजीपाला बियाणे प्राधान्याने उपलब्ध करून दिली.
शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे लागवड करून भाजीपाल्याचे उत्पादन घ्यावे आणि पुढील हंगामासाठी भाजीपाला बियाणे तयार करावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यातून विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाला जातींच्या बियाण्याचा प्रसार गावागावातून होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर पांडुरंग शिंदे, छात्रालयाचे माजी विद्यार्थी प्रशांत चिपटे, दिनेश राणे, प्रदीप इप्ते डॉ. राजन खांडेकर, भिकाजीं कानसे संस्थेचे सदस्य चंद्रकांत मोहिते, प्रभाकर तेरेकर, कुणबी सेवा संघ लांज्याचे अध्यक्ष, श्री शांताराम गाडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. श्रीरंग कद्रेकर, कृषि विस्तार विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, कृषि महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या विद्यार्थिनी तसेच श्री. संजय वैद्य, सदस्य शेतकरी संघटक, केळशी, कुणबी समाजोन्नती संघ, मंडणगडचे अध्यक्ष श्री. दिनेश सापटे यांची मोलाची मदत झाली.
कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार प्रदीप इप्ते, सदस्य प्रभाकर तेरेकर, सुनिल गुरव, चंद्रकांत मोहिते, भिकाजी कानसे, दिनेश राणे, डॉ. राजन खांडेकर यांनी परिश्रम पूर्वक या उपक्रमाची अंमलबजावणी केली. कुणबी सेवा संघांचे कर्मचारी सुनिल ठाकूर, राजेंद्र शिंदे, सौ. वर्षा गोरिवले, सौ. रेणुका शिंदे, सौ. किर्ती घाग, सौ.अनुश्री बुरटे यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.