(दापोली)
दापोलीपासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर असलेल्या मौजे गावतळे (ता. दापोली) येथील गावदेवी मंदिराजवळील तळ्याशेजारी असलेल्या सार्वजनिक कोरड्या विहिरीत मगर पडल्याची माहिती वाकवली (ता. दापोली) येथील सर्पमित्र तुषार महाडीक यांनी ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता वन विभागाला भ्रमणध्वनीद्वारे दिली.
या माहितीच्या अनुषंगाने दापोली परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्र. ग. पाटील, वनरक्षक सुरज जगताप, शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव आणि विश्वंभर झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पाहणी दरम्यान विहिरीत मगर आढळून आली नाही. मात्र परिसराची तपासणी केली असता विहिरीपासून दक्षिणेकडे सुमारे ५० मीटर अंतरावर लाकडांची मोठी आग लागलेली दिसून आली. अधिक बारकाईने पाहणी केल्यावर आगीत एक मगर जळत असल्याचे निदर्शनास आले.
आग तत्काळ विझवण्यात आली आणि मगरीचा अंशतः जळालेला मृतदेह आणि तोंडाचा शिल्लक भाग तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी वनरक्षक शुभांगी भिलारे (ताडील) यांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी तत्काळ वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ७४९९५७५७८९ वर संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी पी. जी. पाटील (दापोली) यांनी केले आहे.