(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थमुक्तीच्या उद्देशाने सुरू असलेल्या “मिशन फिनिक्स” अंतर्गत दापोली आणि मंडणगड तालुक्यात पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी २२ लाख रुपये किमतीचा चरस जप्त केला गेला असून आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. एक आरोपी अद्याप फरार असून लवकरच पोलिसांकडून त्याला ताब्यात घेतले जाईल.
दापोली पोलीस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केळशी किनारा मोहल्ल्यात अनार इस्माईल डायली (३२) यांच्या घरावर छापा टाकला गेला. त्याच्या घरामागील पडवीतून गडद लाल आणि हिरव्या पॅकिंगमध्ये ठेवलेला ०.९९८ किलो वजनाचा चरस जप्त झाला, ज्याची किंमत सुमारे २४ लाख रुपये होती. चौकशीत अनारने अकिल अब्बास होडेकर (४९) कडून हा चरस विक्रीसाठी आपल्याला मिळाल्याचे कबूल केले.
अकिल होडेकर कडून मंडणगड तालुक्यातील साखरी गावातील समुद्रकिनाऱ्यावर लपवलेले उर्वरित ४ पिशव्या चरस जप्त करण्यात आल्या. या पिशव्या मिळून एकूण ४.७३१ किलो चरस जप्त झाला, ज्याची किंमत सुमारे २ कोटी १८ लाख ९२ हजार रुपये आहे. तपासादरम्यान तावीस महमूद डायली (३०) यालाही ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, ठाणे शहर येथील शिळ डायघर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या (गु.र.नं. ८६७/२०२५) एन.डी.पी.एस. गुन्ह्यातील आरोपी ममुद बदुद्दीन ऐनटकर (वय-२९, रा. खोंडा, दापोली) याचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी पोलीस लवकरच त्याचा ठाणे न्यायालयाकडून ताबा घेणार असून, त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईत आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.वी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरसकर आणि त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलीस अजूनही अन्य आरोपी शोधण्यास आणि तपास सुरू ठेवत आहेत.

