(दापोली)
दापोली तालुक्यातील सुप्रसिद्ध व दाभोळचे देवमाणूस डॉ. मधुकर लुकतुके यांना आज सकाळी ६.०० वाजता वयाच्या ९१व्या वर्षी पुणे येथे देवाज्ञा झाली. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी २ वाजता पुणे येथे होणार आहेत. डॉ. मधुकर लुकतुके यांचा दाभोळ येथील दवाखाना गेल्या सहा दशकांपासून चालू होता.
डॉ. लुकतुके यांचा जन्म कोल्हापूरजवळच्या आजरा येथील 1935 सालचा. ते मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पदवीधर झाले. त्यांनी लहानपणी गरिबीमुळे उपचारांअभावी अनेकांचे मृत्यू झाल्याचे खूप जवळून पाहिले होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा गोरगरिबांसाठी उपलब्ध करावी हे त्यांच्या मनात पक्के होते. त्यामुळे त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून ‘पोस्टिंग’ मुद्दाम लहानशा खेड्यात मागून घेतली. यामुळे ते 1960 साली दाभोळला पोचले आणि तेथीलच झाले.
ते डॉक्टर म्हणून रुजू झाल्यावर कधी पायी डोंगर ओलांडून तर कधी होडीने खाडी पार करून पलीकडील गावागावात रुग्ण तपासण्यासाठी जात असत. बऱ्याचदा शेवटची परतीची होडी चुकली किंवा पावसाच्या दिवसांत रात्री अंधारात डोंगर उतरून येणे शक्य नसले, तर ते ती रात्र पेशंटच्या घरी काढत असत. ते स्वतःला वाचन, तंत्रज्ञान या माध्यमातून ‘अप टू डेट’ ठेवत असत.
ते पेशंट तपासताना, त्यांच्याशी बोलताना कधीही खुर्चीत बसत नसत. त्यांच्या दवाखान्यात टेबल-खुर्चीच नव्हतीच! त्यांनी मुद्दाम त्यांच्या दवाखान्यात स्वतःसाठी टेबल-खुर्ची ठेवली नव्हती. त्यामुळे ते ‘बिनखुर्चीचे डॉक्टर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना आजाराचे गांभीर्य आणि रुग्णाचे वय यांचे भान राखून दवाखान्यात हलकेफुलके वातावरण ठेवण्यास आवडत असे. त्यांची विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा हे पेशंटचे आरोग्य आणि तक्रारी यांवरील रामबाण उपाय म्हणुन प्रसिद्ध होते. या ‘बिनखुर्चीच्या डॉक्टरां’शी नुसते बोलून, त्यांच्या स्पर्शाने बरे होणाऱ्या-बरे वाटलेले अनेक रुग्ण दाभोळमध्ये आहेत.
ते त्यावेळी रोज शे-सव्वाशे पेशंट तपासत होते, मात्र पैशाचे बाजारीकरण त्यांच्याकडून कधी झाले नाही. त्यांनी व्यवसायात साधेपण आणि माणुसकी या दोन गोष्टी कधीही सोडल्या नाहीत. ते दवाखान्यातील त्यांच्या मदतनीसांना योग्य मोबदला, गरजेचे शिक्षण, आदर आणि आवश्यक स्वातंत्र्य नेहमीच देत होते. त्यांनी त्याचबरोबर असंख्य वेळा रुग्णांना मोफत सेवा दिली. सन 1960 ते 2023 अशी सलग त्रेसष्ट वर्ष वैद्यकीय सेवा दाभोळ पंचक्रोशीत देणारा असा हा ‘बिनखुर्चीचा डॉक्टर’ नव्हे गावकऱ्यांसाठी ‘देवमाणूस’ च होता.

