(कोल्हापूर)
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “कोल्हापूर सर्किट बेंचचं लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. त्यामुळे मी आता ‘सर्किट बेंच’ म्हणणं बंद करतो. पुढे फक्त ‘खंडपीठ’च म्हणेन.”
सरन्यायाधीश गवई म्हणाले की, “यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे यांना मी सांगू इच्छितो की, कोल्हापूरकरांचा, शाहू महाराजांचा आणि महालक्ष्मी देवीचा तुम्हाला आशीर्वाद लाभो. निवृत्तीला किती दिवस शिल्लक आहेत, हे मला माहित नाही, पण सर्किट बेंचचे खंडपीठात रूपांतर कसे होईल, याचा प्रस्ताव त्वरित तयार करून पाठवा.” त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.
शाहू महाराजांचा आदर्श, कोल्हापूरची सामाजिक चळवळ अधोरेखित
सरन्यायाधीश गवई यांनी भाषणात राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा गौरव केला. ते म्हणाले, “शाहू महाराजांच्या अस्पृश्यताविरोधी लढ्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. राज्याभिषेकानंतर त्यांच्या पहिल्या जाहीरनाम्यातच त्यांनी स्पष्ट केलं होतं की पद हे अधिकार उपभोगण्यासाठी नसून, समाजातील रंजले-गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी असावं. आजही आम्ही तोच विचार पुढे घेऊन चालत आहोत. पद ही नियतीने दिलेली सेवेची संधी असते, ती गाजवण्यासाठी नसते,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
गवई पुढे म्हणाले, कोल्हापूर हे सामाजिक परिवर्तनाचं केंद्र आहे. इथे सर्किट बेंच स्थापन होणं, हा माझ्यासाठी व्यक्तिगत अभिमानाचा क्षण आहे. गेल्या 42 वर्षांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर आज या भागातील नागरिकांना जलद, सुलभ आणि स्थानिक न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील नागरिकांना न्यायासाठी मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शाहू महाराज, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे हे उपस्थित होते. न्यायमूर्ती अराधे यांनी देखील यावेळी कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात हा दिवस ‘एक नवीन पर्वाची सुरुवात’ असल्याचे म्हटले.
सर्किट बेंचमुळे परिसराचा कायापालट
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून केवळ एका महिन्यात सर्किट बेंच इमारतींची डागडुजी आणि नूतनीकरण होत या परिसराचा कायापालट झाला आहे. यामुळे हा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे.
कामकाजाची वेळ
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाची वेळ निश्चित झाली आहे. सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत पहिले सत्र, दुपारी १.३० ते २.३० मधली सुट्टी व त्यानंतर दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत दुसरे सत्र सुरु राहील.
डिव्हिजन बेंचची व्यवस्था
कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या हेरिटेज इमारतीत डिव्हिजन बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीत दोन्ही न्यायमूर्तींचे स्वतंत्र खासगी कक्ष आणि कार्यालयीन कक्ष आहेत. या परिसरात जुन्या हेरिटेज इमारतीत एक डीव्हीजनल बेंच आहे. तर आरसीसी इमारतीत २ सिंगल बेंच आहेत. या इमारतीत रजिस्ट्रार कक्ष, न्यायालयीन कामातील कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था, रेकॉर्ड रुम करण्यात आली आहे.
विविध कार्यालये
प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजव्या बाजूच्या दुमजली इमारतीत सरकारी वकिलांची कार्यालये आहेत. या इमारतीसमोर असलेल्या छोट्या दुमजली इमारतीत काही सरकारी वकिलांची कार्यालये आहेत. परिसरात मध्यस्थी कक्ष करण्यात आला आहे.
राधाबाई बिल्डिंग
ऐतिहासिक अशा राधाबाई बिल्डिंगमध्ये रजिस्ट्रार यांचे कार्यालय, रेकॉर्ड रुम, स्ट्रॉंग रुम व कार्यालये आहेत. नूतनीकरणामुळे या इमारतीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. या इमारतीमध्ये न्यायाधीशांसाठी लॉन्ज, सरकारी वकिलांसाठी कक्ष तयार करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरिकांची सोय
या सर्किट बेंचमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम व पैशांची बचत होईल. शिक्षण, उद्योग, व्यापार, पर्यटन आदी विविध क्षेत्रांचा विकास साधला जाईल. यामुळे कायद्याचे अभ्यासक, वकिल व विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील.

