(रत्नागिरी / वार्ताहर)
मंगला एक्सप्रेसमधून एकट्याने प्रवास करणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाला रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) सतर्कतेमुळे सुरक्षितपणे ताब्यात घेऊन चाइल्ड हेल्पलाइनच्या स्वाधीन करण्यात आले. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. आरपीएफच्या या तत्परतेमुळे संकटात सापडलेल्या अल्पवयीन मुलाला वेळीच मदत मिळाली.
९ जुलै २०२६ रोजी ट्रेन क्रमांक १२६१८ मंगला एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेले तिकीट तपासनीस निखिल कदम (कर्मचारी क्र. ७०७७) यांना एक अल्पवयीन मुलगा एकटाच प्रवास करताना आढळून आला. मुलासोबत कोणीही पालक किंवा नातेवाईक नसल्याचे तसेच त्याच्याकडे प्रवासासंदर्भातील स्पष्ट माहिती नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कदम यांनी तत्काळ सतर्कता दाखवत मुलाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरवले. त्यानंतर लेखी मेमोद्वारे त्याला आरपीएफ पोस्ट रत्नागिरीच्या ताब्यात देण्यात आले.
यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक अशोक आर्य, कर्मचारी अतुल यादव आणि आरपीएफच्या पथकाने मुलाची चौकशी केली. चौकशीदरम्यान मुलाने आपले नाव xxx राठौड, वय १२ वर्षे, असे सांगितले. तो जबलपूर, मध्य प्रदेश येथील असल्याचेही त्याने सांगितले. मात्र, कुटुंबीयांविषयी किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेल्या दूरध्वनी क्रमांकाबाबत त्याला ठोस माहिती देता आली नाही.
मुलगा अल्पवयीन असल्याने आरपीएफने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने रत्नागिरी चाइल्ड हेल्पलाइनशी संपर्क साधला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मुलाला सुरक्षितपणे चाइल्ड हेल्पलाइनच्या ताब्यात देण्यात आले. आता संबंधित यंत्रणेकडून मुलाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात येणार असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
रेल्वे सुरक्षा बलाकडून राबविण्यात येणारे ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हे हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या किंवा कोणत्याही कारणाने संकटात सापडलेल्या बालकांना संरक्षण आणि मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे अभियान आहे. या अभियानांतर्गत रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाते.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर झालेल्या या कारवाईत तिकीट तपासनीस आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे १२ वर्षीय मुलाला वेळीच सुरक्षित आधार मिळाला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच रेल्वे प्रवासादरम्यान अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासाठी रेल्वे सुरक्षा बलाची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.

