(कोल्हापूर)
जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर प्राप्त झाल्याने शुक्रवारी सकाळी कोल्हापुरात मोठी खळबळ उडाली. “जिल्हाधिकारी कार्यालयात पाच आरडीएक्स बॉम्ब लावले असून दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामे करा,” असा मजकूर असलेला मेल सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी प्राप्त झाला.
या धमकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक, तसेच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांची अत्याधुनिक साधनसामग्रीच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली. महसूल, पुनर्वसन, ग्रामपंचायत, निवडणूक विभाग तसेच जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीच्या ठिकाणीही यावेळी सखोल तपास करण्यात आला.
नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कामकाजासाठी नागरिकांची गर्दी होती. मात्र धमकीचा मेल प्राप्त होताच परिसरात एकच धावपळ उडाली. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिक आणि कर्मचारी कार्यालयाबाहेर काढण्यात आले. संपूर्ण इमारतीत बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोलीस आणि अग्निशमन दलाकडून तपासणी करण्यात आली.
दरम्यान, हा धमकीचा मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, याचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू असून, कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येणार आहे.

