(सावंतवाडी / आंबोली)
वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा सतिचीवाडी येथील पाण्याने भरलेल्या चिरेखाणीमध्ये बुडून मृत्यू झाला. संजय लक्ष्मण गांवकर (वय ५०, रा. इन्सुली, ता. सावंतवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे, आंबोली परिसरात अवघ्या सहा दिवसांत वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने पर्यटन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव उद्यमनगर येथील हिंदुस्थान पॉलीमर्स कंपनीत काम करणारे कर्मचारी माजगाव, इन्सुली आणि परिसरातील मिळून सुमारे ११ जणांचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आला होता. यावेळी त्यांनी सतिचीवाडी येथील एका चिरेखाणी परिसरात वेळ घालवला. काही जण चिरेखाणीतील पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरले होते. याचवेळी संजय गांवकर यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या व्यक्तींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी तातडीने रेस्क्यू टीम आणि आंबोली पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली आणि सांगेली रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर यांनी खोल पाण्यात उतरून शोधमोहीम राबवत संजय गांवकर यांचा मृतदेह बाहेर काढला. या बचाव कार्यात अजित नार्वेकर यांच्यासह राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांनी मदत केली.
दरम्यान, आंबोली परिसरात रविवारी सर्पदंशामुळे एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. अवघ्या सहा दिवसांत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने आंबोलीतील वर्षा पर्यटनाच्या काळातील सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार लक्ष्मण काळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात चिरेखाणी, धबधबे, तलाव आणि खोल पाण्याच्या ठिकाणी पर्यटन करताना पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पोहणे किंवा पाण्यात उतरणे धोकादायक ठरू शकते.

