(मुंबई)
राज्यातील अनेक शाळा विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करण्यासाठी आपल्या नावात ‘International’, ‘Global’, ‘CBSE’, ‘English Medium’ असे शब्द वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर मानून पुढील काळात शाळांना अशी नावे देण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण संचालक कार्यालयाने अधिकृत पत्रक जारी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा दिला आहे. बऱ्याचदा शाळा आपल्या नावामध्ये अशा फॅन्सी शब्दांचे वापर करतात ज्यामुळे सहाजिकच विद्यार्थी आणि पालक यांचा गैरसमज होऊन त्यांची फसवणूक होते.
शिक्षण विभागाकडे प्राप्त होणाऱ्या विविध प्रकरणांच्या तपासणीत शाळांच्या नावांमध्ये मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती दिली जात असल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक शाळा या राज्य मंडळाशी संलग्न असताना त्यांच्या नावात ‘International’, ‘Global’ किंवा ‘CBSE’ असे शब्द वापरत असल्याचे आढळले आहे. तसेच काही शाळांच्या नावात ‘English Medium’ असा उल्लेख असतो, मात्र त्यांना प्रत्यक्षात मराठी माध्यमाचीच मान्यता असल्याचे दिसून येते.
नियमानुसार, शाळेच्या नावात ‘International’ किंवा ‘Global’ असा शब्द वापरायचा असल्यास त्या शाळेच्या शाखा परदेशात असणे आवश्यक आहे. तसेच त्या शाळेची संलग्नता आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मंडळाशी असणे अपेक्षित आहे. याचप्रमाणे ‘CBSE’ हा शब्द बोर्डाचे नाव असल्याने तो शाळेच्या नावात वापरणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शाळांच्या नावांमध्ये ‘International’, ‘Global’, ‘CBSE’, ‘English Medium’ असे शब्द वापरल्यामुळे शासन, समाज, पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दिशाभूल करणाऱ्या नावांचा समाजावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे शिक्षण संचालक कार्यालयाने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर, स्वयंसहाय्यित नवीन शाळांना मान्यता देणे तसेच दर्जावाढ प्रस्तावांच्या छाननीसाठी आयोजित राज्यस्तरीय प्राधिकरणाच्या बैठकीत हा मुद्दा सविस्तरपणे चर्चेला घेण्यात आला. पालक आणि विद्यार्थ्यांवर होणारा संभाव्य नकारात्मक परिणाम लक्षात घेता, पुढील काळात अशा प्रकारची नावे शाळांना देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच शाळांच्या नावांमध्ये वरील शब्द वापरण्याबाबतचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा ठाम इशाराही शिक्षण संचालक कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

