(रायगड)
राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली असताना, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील आगरकोट किल्ला येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील महिला पर्यटकावर बुरुजाचा काही भाग कोसळून ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पुरातत्त्व विभागाच्या हलगर्जीपणावर स्थानिक आणि पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जखमी महिलेचे नाव अबोली श्रीकांत देशपांडे (वय ५३) असून त्या पुण्याहून कुटुंबासोबत रायगड जिल्ह्यात पर्यटनासाठी आल्या होत्या. स्वातंत्र्य दिन, दहीहंडी आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्यातून अनेक पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. देशपांडे दाम्पत्याचे वास्तव्य नागाव येथे होते.
रविवारी दोघं रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ला आणि प्रसिद्ध सातखणी बुरुज पाहण्यासाठी गेले होते. किल्ल्याची सफर करून झाल्यानंतर, अबोली देशपांडे बुरुजाजवळ ठेवलेली बॅग उचलण्यासाठी परत आल्या. त्याच क्षणी बुरुजाचा सिमेंटचा काही भाग अचानक कोसळला आणि त्यांच्या डोक्यावर पडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
इतिहासाला सुरुंग? स्थानिकांचा संताप
या घटनेनंतर पुरातत्त्व विभागाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त होत आहे. आगरकोट किल्ला आणि सातखणी बुरुज हे सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून, त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासन, पुरातत्त्व खाते आणि राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. तज्ज्ञांच्या मते, “तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून बुरुजांची डागडुजी आवश्यक आहे. धोकादायक भागांवर सूचना फलक लावणे बंधनकारक करावे. पर्यटकांसाठी सुरक्षिततेची ठोस उपाययोजना तात्काळ हाती घेणे गरजेचे आहे.”
या दुर्घटनेमुळे एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. काही स्थानिकांच्या मते, “सरकारी यंत्रणा आणि बिल्डर लॉबीच्या संगनमताने आगरकोट किल्ल्याची सुरक्षा न करता, तो नकाशावरून आणि गुगलवरून हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐतिहासिक वास्तू नष्ट करून त्या जागेवर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा डाव आखला जात आहे.”
पर्यटक व स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय पुरातत्त्व विभाग, राज्यपाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटनमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

