(रायगड / कोलाड)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) वरील अपघातांची मालिका सुरूच असून, गुरुवार (दि. 23 जुलै 2026) रोजी सुकेळी खिंडीतील तीव्र उतारावर ट्रेलरचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर रस्त्यातच आडवा झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, स्थानिक नागरिक आणि वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाडकडून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर (क्र. NL-01-AJ-0132) सुकेळी खिंडीतील तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. वेगावर नियंत्रण न राहिल्याने ट्रेलर रस्त्यातच अडकल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ट्रेलर रस्त्याच्या बाजूला हलविण्यात आला. त्यामुळे काही वेळातच महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या अपघातात ट्रेलर चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातामुळे ट्रेलरचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी किंवा इतर वाहनांचा सहभाग नसल्याने मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुकेळी खिंड हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकादायक टप्पा मानला जातो. तीव्र उतार, अवघड वळणे आणि जड वाहनांची मोठी वाहतूक यामुळे या परिसरात वारंवार अपघात घडत असतात. विशेषतः पावसाळ्यात रस्ता निसरडा होत असल्याने चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरीने वाहन चालविण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही सुकेली खिंडीतील धोकादायक वळणांवर अतिरिक्त सुरक्षात्मक उपाययोजना, इशारा फलक आणि जड वाहनांसाठी विशेष नियंत्रण व्यवस्था करण्याची मागणी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या भागात अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

