(मुंबई)
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संतोष धुरी यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजप नेते आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत आज त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीमुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांची भेट घेतल्यानंतर संतोष धुरी भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
भाजपमध्ये प्रवेशानंतर संतोष धुरी यांनी मनसे आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, जागावाटपाच्या चर्चेत संदीप देशपांडे यांना सहभागी करून घेतले गेले नाही. मातोश्रीवरून थेट आदेश देत आम्हाला चर्चेबाहेर ठेवण्यात आले. कुटुंब एकत्र येण्यासाठी आमचा बळी देण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.
धुरी पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी मनसेचे सहा नगरसेवक फोडले, तरीही आम्ही ते विसरलो. मात्र आमच्या नेत्यांना सातत्याने त्रास दिला गेला. उद्धव ठाकरे यांनी मनसेचा ताबा घेतला आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसमोर पक्ष सरेंडर केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशामागील प्रमुख कारण म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील जागावाटप. वॉर्ड क्रमांक १९४ मधून धुरी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. ही जागा युती अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांना देण्यात आली. याच मतदारसंघातून धुरी यांनी यापूर्वी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
यावेळी संदीप देशपांडे यांनी धुरी यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. अखेर या नाराजीचा परिणाम म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या घडामोडीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेची अडचण वाढली असून भाजपची ताकद वाढल्याचे चित्र दिसत आहे.

