(दापोली)
तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे असोड गावातून कुंभारवाडी व गणेशवाडीला जाणारा महत्त्वाचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. रस्त्यासोबत असलेली मोरी आणि गौरी पाण्याच्या प्रचंड वेगाला तोंड देऊ न शकल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला. त्यामुळे कुंभारवाडी व गणेशवाडी या वाड्यांचा संपर्क दापोली शहराशी तुटला आहे. सध्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.
पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या ओव्यामुळे रस्त्याला भगदाड पडले. या रस्त्यावरूनच नळपाणी योजनेचे पाईप जात असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. तसेच, रस्त्यालगत असलेली पिण्याच्या पाण्याची विहीर नागरिकांसाठी दुर्गम झाली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे.
हा रस्ता दापोलीच्या मुख्य रस्त्याला जोडणारा असून येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे, या रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, त्याच वेळी ग्रामपंचायतीने मोरीच्या जागी पुलाची मागणी केली होती. मार्च २०२३ मध्ये जिल्हा परिषदेकडे लेखी पत्राद्वारे याबाबत विनंतीही करण्यात आली होती. मात्र, ती दखल न घेतल्याने आज ही आपत्ती ओढवली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, गावाच्या मुख्य रस्त्यावर पडलेली दरड जेसीबीच्या सहाय्याने हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, उनवरे-वावधर मार्गावर नदीसारखे पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. सध्या या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तातडीने मदत व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

