(नवी मुंबई / भरत माने)
इच्छापूर्ती दत्त दिगंबर स्वामी मंदिर नेरुळ सेक्टर 15 येथे गोकुळाष्टमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह व श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहचा प्रारंभ 10 ऑगस्ट पासून झाला. या कार्यक्रमाचे आयोजन ॐ श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्मसिंधू सद्गुरू दिगंबर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. ॐ श्री सद्गुरू सीताराम शांतीस्थान संस्थाने या उपक्रमाचे नीटनेटके आयोजन केले आहे. यामध्ये दररोज सकाळी 4 वाजता काकडा, दुपारी 3 ते 4 नाम यज्ञ व सायंकाळी 6 वाजता हरिपाठ व आरती पडत आहे. मंदिरात हरिपाठ व गुरुचरित्र पठण मागील अनेक वर्षे अखंडपणे सुरु आहे.
या सप्ताह निमित्ताने दररोज सायंकाळी 7.30 ते 9.30 प्रसिद्ध कृष्ण कथाकार हभप नारायण महाराज काळे (देवाची आळंदी) यांची संगीतमय कृष्णकथा सुरु आहे. तसेच या सप्ताहात अखंड वीणा पूजन सुरु होते. याची सांगता आज (दिनांक 16 ऑगस्टला) सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर दिंडी सोहळा व महाप्रसाद होऊन सप्ताहची सांगता होईल.
या सोहळ्यासाठी दररोज अनेक मान्यवर, भक्त वर्ग, नामधारक, अनुयायी उपस्थित दर्शवत आहेत. या सोहळ्यात सहभागी होऊन भगवान दत्त व सद्गुरू दिगंबर स्वामी यांच्या दर्शनाचा लाभ शेकडो भाविक घेत आहेत. हा कार्यक्रम यशस्वी होण्या साठी मंदिरातील सर्व सभासद मेहनत घेत आहेत. नवी मुंबई परिसरातील हा सर्वात मोठा कृष्ण जन्म सोहळा आहे. यावेळी मठाधीपती महामंडलेशवर दिगंबर स्वामी यांनी मंदिरामध्ये होणारे धार्मिक,सामाजिक, शैक्षणिक उपक्रम यांची माहिती सांगितली.त्याचबरोबर मंदिर संस्था अध्यक्ष आर. सी. पाटील यांनी दत्त मंदिर व दिगंबर स्वामी यांचे महात्म्य सांगून विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान केले.

