(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जी.जी.पी.एस. प्राथमिक विभागात गोकुळाष्टमीनिमित्त पारंपरिक दहीहंडी सोहळा गुरुवारी जल्लोषात पार पडला. मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, वेशभूषा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण कृष्णमय झाले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या मूर्ती पूजनाने झाली. पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाचे वेश परिधान करून लहान गोप-गोपिकांच्या वेशात रंगत आणली, तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. मुख्य आकर्षण ठरले ते पाचवीतील चिमुकल्यांनी रचलेले मानवी मनोरे आणि त्यातून पारंपरिक पद्धतीने फोडलेली दहीहंडी.
सोहळ्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. शिल्पा पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे आणि शाळा समिती अध्यक्ष श्री. सुहासभाऊ पटवर्धन यांनी उपस्थित राहून बालगोपाळांचे कौतुक केले. प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून लाडूंचे वाटप करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेची काळजी घेत कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

