( मुंबई )
राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जंगलतोडीमुळे जंगली जनावरांचा त्रास वाढत असून त्याचा थेट फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसत आहे. या परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती जवळपास सोडली असल्याचा दावा करत शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ग्रामीण भाग विकासापासून वंचित राहत असताना वनमंत्री गंभीर प्रश्नांऐवजी टीआरपी मिळवण्यात व्यस्त असल्याचा टोला त्यांनी लगावला.
सध्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या वादात निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक हे सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून निलेश राणे यांनी थेट वन खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये निलेश राणे म्हणाले की, कोकणासह राज्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू असल्याने जंगली जनावरांचा त्रास वाढला आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी तर या त्रासामुळे शेती सोडली आहे. वनखात्याची स्थिती गंभीर असून अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, पायाभूत सुविधांसाठी निधी नाही आणि आवश्यक साधनसामग्रीचा अभाव आहे, असा आरोप त्यांनी केला. काही भागांत दुसऱ्या राज्यातील विभागीय वन अधिकारी असल्याने स्थानिक ग्रामीण भागाला त्याचा फायदा होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
लाकूडतोड इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की ती परवानगीने चालते आहे का, असा सवाल उपस्थित करत “वन राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे??” असा थेट प्रश्न निलेश राणे यांनी विचारला आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी खात्यातील कामकाजाकडे दुर्लक्ष आणि भ्रष्टाचाराचा आरोपही केला.
वनखात्यामुळे ग्रामीण विकास रखडल्याचा आरोप
नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला. मात्र या निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी “जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले, तसे आता जंगल पोखरले जात आहेत” असा आरोप केला.
अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना वन विभागाकडून परवानगी दिली जात नसल्याने ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो, असा दावा करत निलेश राणे यांनी वनमंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. या आरोपांना वनमंत्री गणेश नाईक काय प्रत्युत्तर देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

