(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरानजीक असलेल्या कुवारबाव पुलावर रेल्वेची धडक बसून एका अज्ञात पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १७ जानेवारी) दुपारी घडली. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी दिवा–पॅसेंजर रेल्वे कुवारबाव पुलावरून जात असताना रुळांवर असलेल्या एका अज्ञात पुरुषाला जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत संबंधित व्यक्तीच्या शरीराचे दोन भाग झाले असून, त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत व्यक्तीचे अंदाजे वय ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू असून, अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

