( मुंबई )
मेडिकल अभ्यासक्रम पूर्ण करून इंटर्नशिपसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये नियुक्त करण्यात आलेले बीएएमएस, बीयूएमएस आणि परदेशातून एमबीबीएस पूर्ण केलेले डॉक्टर्स महिन्यातील केवळ सहा-सात दिवसच रुग्णालयात उपस्थित राहत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर आता या इंटर्न डॉक्टरांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून सर्व जिल्ह्यांतील आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सकांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
बीएएमएस, बीयूएमएस तसेच परदेशातून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किंवा संबंधित महाविद्यालयांकडून इंटर्नशिपसाठी सूची पाठवण्यात येते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना विविध आरोग्य संस्थांमध्ये ६ महिन्यांसाठी इंटर्नशिपसाठी नियुक्त केले जाते. मात्र, काही इंटर्न डॉक्टर नियमितपणे अनुपस्थित राहत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे इंटर्नशिप कालावधीत त्यांच्या उपस्थितीवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात आली आहे.
हजेरी पत्रक जोडणे बंधनकारक
इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा आरोग्य केंद्र प्रमुखांनी देण्यात येणाऱ्या इंटर्नशिप प्रमाणपत्रासोबत बायोमेट्रिक हजेरी पत्रक संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पत्रकात इंटर्न डॉक्टरचे नाव, नियुक्त आरोग्य संस्थेचे नाव, येण्याची वेळ, जाण्याची वेळ आणि एकूण कामाचे तास यांचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हे पत्रक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी आणि शिक्क्यासह प्रमाणित केलेले असावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी या डॉक्टरांची उपस्थिती तपासली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे इंटर्नशिप काळात डॉक्टर्सची उपस्थिती आणि शिस्त सुनिश्चित होणार असून, ग्रामीण व निमशहरी भागात रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.