(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात पुन्हा एकदा दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. मुर्शी व दक्खन दरम्यान, नव्याने बनविण्यात आलेल्या काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मोठा मातीचा व खडकांचा डोंगरच कोसळला.
गेल्या काही दिवसांपासून घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यातच रत्नागिरी–नागपूर महामार्गासाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात डोंगराची बिनधास्त कटाई सुरू आहे. या उघड्या जखमा झालेल्या डोंगरकड्यांवर पावसाचे पाणी कोसळताच मोठमोठे दगड व माती रस्त्यावर येत आहे. आजची दरड थेट मुख्य रस्त्यावर आल्याने वाहनधारकांसाठी जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आली आहे.
दरड हटवण्याचे काम सुरू असून, मुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. स्थानिकांनी प्रशासनाला वारंवार इशारे दिले असतानाही डोंगरकटाईचे काम वेगाने सुरू असल्याने अशा अपघाती घटनांची मालिका कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

