(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बाजारपेठ येथील रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन नुकतेच मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून तर रिक्षा स्टॅन्डला देण्यात आलेल्या रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना या नामफलकाचे अनावरण मालगुंडचे सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी यांचे हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी मालगुंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्मिता दुर्गवळी, माजी सरपंच दीपक दुर्गवळी,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, नितीन दुर्गवळी, संजय दुर्गवळी, रत्नदुर्ग रिक्षा व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष दिलीप भातडे व सर्व सदस्य तसेच मालगुंड बाजारपेठेतील व्यवसायिक व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
रत्नदुर्ग व्यावसायिक संघटना ही मालगुंड ग्रामपंचायतीच्या सन २०१६/१७ मधील मान्यतेनुसार कार्यरत आहे. या संघटनेमध्ये मान्यता प्राप्त एकूण 18 रिक्षा व्यवसायिक व्यवसाय करतात. तसेच या संघटनेला सन 2002 मध्ये आरटीओ ची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. या संघटनेच्या सर्वच व्यवसायिकांनी आपला रिक्षा व्यवसाय प्रामाणिकपणे करताना जनमानसात आपली विश्वासाहर्ता निर्माण केली आहे.
या संघटनेचे मालगुंड बाजारपेठ येथील रिक्षा स्टॅन्ड सुंदर व सुसज्ज करण्याच्या उद्देशाने मालगुंड येथील सामाजिक कार्यकर्ते राजू साळवी ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, राजे ग्रुपचे अध्यक्ष बाबा आग्रे, उपाध्यक्ष संजय पांडुरंग दुर्गवळी आदींनी सामाजिक भावनेतून मदतीचा हात दिला. त्यामुळे या संघटनेचे रिक्षा स्टॅन्ड आता नव्या रूपात आले आहे. यावेळी नव्या रूपात आलेल्या रिक्षा स्टॅन्ड चे आणि रिक्षा स्टॅन्ड ला देण्यात आलेल्या नामफलकाचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या उद्घाटन व अनावरण कार्यक्रम प्रसंगी मालगुंड बाजारपेठेतील व्यवसायिक व प्रतिष्ठित ग्रामस्थांनी उपस्थित राहून रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटनेच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

