(दापोली-रत्नागिरी/प्रतिनिधी)
तालुक्यातील हर्णे गोवा किल्ल्याच्या किनाऱ्यावर कस्टम विभागाने राबवलेल्या गुप्त कारवाईत तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त करण्यात आले. १२ ऑगस्ट रोजी मिळालेल्या पक्क्या गोपनीय माहितीच्या आधारे १४ ऑगस्टला ही धाडसी मोहीम पार पडली.
सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक (पी अँड आय) अतुल पोतदार आणि अधीक्षक (हरनाई) विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने समुद्रकिनाऱ्यावर शोधमोहीम राबवली. यावेळी पांढऱ्या-हलका तपकिरी रंगाचा, चिकट व जेलीसरखा ४ किलो १४० ग्रॅम वजनाचा गोळा हस्तगत करण्यात आला. तपासात हा दुर्मिळ व अमूल्य ‘अंबरग्रीस’ असल्याचे स्पष्ट झाले.
सीमाशुल्क आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांनुसार या पदार्थाचा ताबा किंवा व्यापार गंभीर गुन्हा आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत अफाट असल्याने तस्करीत वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
सध्या कोणालाही अटक झालेली नसून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी असा पदार्थ आढळल्यास त्वरित ८७९६८९५९९० या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

