( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी येथील बहुचर्चित भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित दुर्वास पाटील याला न्यायालयाने बुधवारी त्याचे वडील दर्शन पाटील यांच्या अंत्यसंस्कारास हजर राहण्याची परवानगी दिली. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पोलिस बंदोबस्तात त्याला अंतिम विधीस उपस्थित राहता आले.
दरम्यान, दुर्वास पाटीलने वडिलांच्या उत्तरकार्याच्या विधींसाठी १५ दिवसांच्या जामिनाची मागणी न्यायालयाकडे केली आहे. या अर्जावर बुधवारी दिवसभर सुनावणी झाली. सरकारी पक्षाने या मागणीला जोरदार आक्षेप घेतला असून, पुढील सुनावणी शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यादिवशी न्यायालय आपला निर्णय देण्याची शक्यता आहे.
दुर्वासचे वडील दर्शन पाटील हे सीताराम वीर खूनप्रकरणातील संशयित आरोपी होते. न्यायालयीन कोठडीत असताना प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर प्रथम रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार झाले. प्रकृती गंभीर होताच न्यायालयाने २३ सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच ३० सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर दुर्वास पाटीलने वडिलांच्या सर्व दिवस-वार करण्यासाठी न्यायालयीन मुभा मागितली आहे. या मागणीवरून पुन्हा एकदा कायदेशीर पेच निर्माण झाला असून, न्यायालयाच्या आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

