(मुंबई)
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेचं तिकिट न मिळालेल्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणासाठी 23 आणि 24 ऑगस्ट रोजी दोन विशेष मोफत रेल्वे गाड्या धावणार असून, या सेवेमुळे अनेक कोकणवासीयांना आपल्या गावी सहज जाता येणार आहे. या विशेष ट्रेन सेवा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात येत आहेत. या उपक्रमाचे हे 13 वे वर्ष असून यंदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, गणपती स्पेशल ‘मोदी एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे सेवा गेली 12 वर्षे कोकणवासीयांच्या सेवेत कार्यरत आहे. यंदा जनतेच्या भरभरून प्रेमाच्या प्रत्युत्तरादाखल दोन विशेष ट्रेन चालवण्यात येणार असून, या दोन्ही ट्रेनचे तिकीट पूर्णतः मोफत असेल. याशिवाय प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मोफत जेवण व पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोकणातील जनतेनं भाजप आणि राणे कुटुंबीयांवर दाखवलेला विश्वास आणि प्रेम लक्षात घेता, हे सेवा कार्य एक कृतज्ञता म्हणून राबवले जात आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडीच्या जनतेनं तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्याने, हे योगदान ही एक छोटीशी परतफेड आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या विशेष गाड्यांचे वेळापत्रक असे आहे की, शनिवार 23 ऑगस्ट आणि रविवार 24 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून या गाड्या सुटणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी रत्नागिरी आणि कुडाळ येथे थांबत सावंतवाडी येथे थांबेल. तर 24 ऑगस्ट रोजीची दुसरी गाडी वैभववाडी आणि कणकवली येथे थांबणार आहे. ही ‘डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेस’ कोकणातील सर्व गणेशभक्तांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
या प्रवासासाठी इच्छुक नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदवायचं असून, तिकीट वाटप सोमवार 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.

