(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोकणातील दुर्गम व ग्रामीण भागातील प्रवाशांसह मुंबई-पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, चिपळूण, कासे, नारडुवे मार्गे पेढांबे अशी नवीन एसटी बस सेवा गणेशोत्सवापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही बस कायमस्वरूपी धावणार असून प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
या नव्या बस सेवेच्या प्रारंभामुळे असुर्डे, नायशी, कोकरे, कळंबुशी, कासे, माखजन, नारडुवे आणि पेढांबे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत पुण्याकडे प्रवास करताना अनेकांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. रात्री उशिरा मुख्य महामार्गावर उतरल्यावर गावापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतुकीची अडचण निर्माण होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. आता ही थेट एसटी सेवा सुरू झाल्याने गावापर्यंत सुरक्षित, किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवास शक्य होणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरणार आहे. आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने कुटुंबासह नियोजनबद्ध प्रवास करणे अधिक सोपे होणार आहे.
या मार्गावरील प्रवाशांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ मिळणार आहे. ‘महिला सन्मान योजना’अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळेल. तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या सवलती आणि ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधाही या बससेवेत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार, शैक्षणिक तसेच अन्य कारणांसाठी पुण्याकडे जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
बसचे वेळापत्रक
दररोज रात्री ८.३० वाजता ही बस पिंपरी-चिंचवड येथून सुटून स्वारगेट, सातारा, कोयनानगर, चिपळूण, नायशी, कळंबुशी, कासे, माखजन आणि नारडुवे मार्गे सकाळी पेढांबे येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात बस दररोज सकाळी ८.०० वाजता पेढांबे येथून सुटून याच मार्गाने पिंपरी-चिंचवडकडे रवाना होईल.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
ही बस सेवा सुरू करण्यामागे स्थानिक पातळीवरील सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. समाजसेवक विजय शिगवण (नारडुवे) आणि ‘टीव्ही ९ मराठी’चे प्रतिनिधी वैभव घाग यांनी या मागणीसाठी परिवहन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना नारडुवेचे सरपंच कृष्णाजी जोगळे, उपसरपंच विजय जोगळे तसेच पेढांबेच्या सरपंच मानसी मते आणि उपसरपंच अनंत वरवटकर यांनी सक्रिय सहकार्य केले.
या मागणीची सकारात्मक दखल घेत नवीन बस सेवा मंजूर केल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन महामंडळ तसेच पाठपुरावा करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे परिसरातील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.

