(रत्नागिरी / वार्ताहर)
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील सेवक कृष्णा भागा आलीम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महाविद्यालयात असताना दुपारी मेंदूचा झटका आल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. करबुडे, उगवती पाचकुडेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाविद्यालय व संस्थेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
१ फेब्रुवारी २०२१ मध्ये आलीम हे महाविद्यालयात सेवक म्हणून रूजू झाले. त्यांनी कार्यालय, स्वच्छतागृह, सेमिनार हॉल, महाविद्यालयाच्या परिसरातील बाग बगिचा या ठिकाणी उत्तम काम केले. कोणत्याही कामाला नकार न देणारे काका म्हणून ते अल्पावधीतच सर्वांच्याच ओळखीचे झाले होते. त्यांना महाविद्यालयाचा आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

