( राजापूर / तुषार पाचलकर )
राजापूर तालुक्यातील करक-कारवली तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम गेले वर्षभर रखडले आहे. या कामाकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याने पंचक्रोशीतील जनता संतापली असून या इमारतीच्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते श्री.नारायण पांचाळ यांनी सांगितले.
गेली २० वर्षे भाड्याच्या घरात सुरू असलेले करक-कारवली तीठा येथिल प्राथमिक आरोग्य केन्द्र इमारतीचे काम वर्षांपूर्वी सुरु करण्यात आले होते. परंतु गेले वर्षभर हे काम रखडले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या गाठीभेटी घेता व ग्रामस्थांच्या मागणीची निवेदने देऊनही या इमारतीच्या उर्वरित बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, या ठिकाणी सुसज्ज आरोग्य केंद्राची नित्तांत गरज भासत असतांना, इमारतीच्या बांधकामात अक्षम्य दिरंगाई दिसून येत असल्याने स्थानिक लोक व कार्यकर्त्यांनी गणपतीपूर्वी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री. नारायण पांचाळ यांनी जाहीर केले आहे.
सध्या हे आरोग्य केंद्र कारवली तिठा येथे श्री.नारकर यांच्या राहत्या घरात सुरू आहे. या ठिकाणी तात्पुरती सोय करण्यात आली असली तरी, त्या ठिकाणी आरोग्य केंद्राच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. शासकीय इमारतीमध्ये या सर्व सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतात, म्हणून इमारतीचे बांधकाम वेळीच पूर्ण होणे आवश्यक आहे.
पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीचा व येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून 2024 च्या सुरुवातीला इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर या इमारतीचे काम थांबणार नाही असे लोकांना वाटले होते. तथापि, गेले वर्षभरात काम रखडल्यामुळे पंचक्रोशीतील जनतेमध्ये नाराजी पसरली आहे.
सध्या भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या आरोग्य केंद्रात परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येत असून येथील आरोग्य सेवेचा लाभ घेत आहेत,आरोग्य केंद्र इमारत व चांगल्या सोयी सुविधा येथील जनतेला उपलब्ध व्हाव्यात म्हणून कारवली ग्रामपंचायत व क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील आहेत. सदर आरोग्य केंद्र उभे राहण्यासाठी परिसरातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
गणपती उत्सव लवकरच सुरू होत आहे, त्या दरम्यान मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावी येतील. त्यामुळे आंदोलन मोठ्या संख्येने व व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येईल असा विश्वास श्री.नारायण पांचाळ यांनी व्यक्त केला आहे.