(रायगड)
नाताळ सण आणि सलग सुट्ट्यांचा फायदा घेत मुंबई व ठाण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मुंबई–गोवा महामार्ग तसेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली. एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक व्यवस्थापन कोलमडले.
सलग सुट्ट्यांमुळे मुंबईकरांचा ओघ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे वळला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले असून त्याचा थेट परिणाम रस्ते वाहतुकीवर दिसून येत आहे.
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी सकाळपासून वाहतूक संथ झाली आहे. खालापूर टोलनाक्यापासून लोणावळा एक्झिटपर्यंत घाट परिसरात सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा वेळ लागत होता. घाट परिसरात अनेक ठिकाणी वाहन नादुरुस्त होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
दुसरीकडे मुंबई–गोवा महामार्गावरही परिस्थिती तशीच आहे. पेण ते वडखळ या पट्ट्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वाहनचालकांकडून वाहतूक शिस्त पाळली जात नसल्याने कोंडी अधिक तीव्र झाली. वडखळ ते अलिबाग दरम्यानही वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. अचानक वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहतूक नियंत्रणात आणणे पोलिसांसाठी आव्हान ठरले.
रायगडमध्ये पर्यटनाला तेजी
नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू झाला आहे. हजारो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर येथील समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मात्र चांगलीच चालना मिळणार आहे.

