(नाशिक / वृत्तसंस्था)
राज्यभर गाजत असलेल्या तब्बल १६० कोटी रुपयांच्या बनावट शालार्थ घोटाळ्यात नाशिक शहर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपक काशीनाथराव गरुड याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह त्याचा १८ वर्षीय मुलगा राजवीर गरुड आणि आणखी दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील बिजासन घाटातून ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे, वडिलांना पोलिसांपासून लपवून अटक टाळण्यास मदत केल्याचा आरोप ठेवत राजवीर दीपक गरुड यालाही सहसंशयित करण्यात आले आहे.
१८४ कर्मचाऱ्यांच्या नावावर १६० कोटींची फसवणूक
नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार विभागातील १८४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर कोणतीही वैध मान्यता किंवा शालार्थ प्रस्ताव नसताना मागील तारखांचे बनावट नियुक्ती आदेश तयार करण्यात आले. त्यानंतर शालार्थ प्रणालीत बोगस माहिती भरून वेतन व थकबाकी काढण्यात आली. या माध्यमातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
या घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे १,२०० संशयितांची नावे समोर आली असून तपासाचा विस्तार सुरू आहे.
१५ संस्थांतील १७७ कर्मचाऱ्यांसाठी बनावट आदेश
पोलिसांच्या तपासात, दीपक काशीनाथराव गरुड (वय ५२, रा. पारसनगर, शेंदुर्णी, जि. जळगाव) हा एका शैक्षणिक संस्थेचा सहसचिव असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने इतर संशयितांच्या मदतीने १५ शैक्षणिक संस्थांतील १७७ कर्मचाऱ्यांसाठी बनावट शालार्थ आदेश तयार करून घेतल्याचा आरोप आहे. हे आदेश तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावाने तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांपासून लपण्यासाठी मुलाची मदत
गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक गरुड फरार झाला होता. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा मुलगा राजवीर गरुड वडिलांना विविध ठिकाणी आसरा देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर राजवीरलाही या गुन्ह्यात सहसंशयित करण्यात आले.
बिजासन घाटातून चौघांना ताब्यात
गुन्हे शाखेच्या पथकाला संशयित धुळे जिल्ह्यातील बिजासन घाट परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे सापळा रचण्यात आला. या कारवाईत दीपक गरुडसह त्याचा मुलगा राजवीर, सोपान सुपुडू बारी (वय ५२, रा. शेंदुर्णी, जि. जळगाव) आणि पंकज माधवराव चव्हाण (वय ४२, रा. रांजणगाव, ता. चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात भारतीय न्यायसंहितेचे कलम २४९ वाढविण्यात आले असून, न्यायालयाने दीपक गरुड याला ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर संशयितांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

