(पुणे / वृत्तसंस्था)
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र तसेच राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि अभिनेत्री व मॉडेल कायनात धार यांचा साखरपुडा बुधवारी (29 जुलै) पुण्यातील येरवडा येथील द रिट्झ-कार्लटन (The Ritz-Carlton) पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत खासगी आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला. मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला राज्यातील अनेक राजकीय दिग्गजांनी हजेरी लावत नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांच्या विवाहाची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू होती. त्या चर्चांवर शिक्कामोर्तब करत पार्थ पवार आणि कायनात धार यांनी साखरपुड्याच्या माध्यमातून आपल्या नव्या आयुष्याची अधिकृत सुरुवात केली. दोघांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार असल्याची अधिकृत माहितीही यावेळी देण्यात आली.
या साखरपुडा सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दत्ता भरणे, खासदार निलेश लंके, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, मंत्री आदिती तटकरे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार आणि कायनात धार यांची ओळख काही वर्षांपूर्वी झाली होती. कालांतराने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पुण्यात साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
दरम्यान, कायनात धार यांच्याबाबत काही माध्यमांमध्ये त्यांच्या जन्मस्थळ आणि नावासंदर्भात चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे समोर आले होते. यानंतर अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले की, कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वैयक्तिक माहितीबाबत प्रसारित होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.
विवाहाच्या तारखेबाबत धार्मिक शंकांचेही निरसन
पार्थ पवार यांच्या विवाहाच्या तारखेबाबत समाजात व्यक्त होत असलेल्या काही धार्मिक शंकांवरही यावेळी स्पष्टीकरण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी करवीर पीठाचे शंकराचार्य यांची भेट घेऊन धर्मशास्त्रानुसार मार्गदर्शन घेतल्याची माहिती दिली.
कुटुंबातील आई किंवा वडिलांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आतच विवाह करावा, अन्यथा पुढील तीन वर्ष विवाह करता येत नाही, अशी समाजात प्रचलित समजूत आहे. मात्र, शंकराचार्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, धर्मशास्त्रानुसार आवश्यक विधी आणि संस्कार योग्य प्रकारे पूर्ण करणे महत्त्वाचे असते. एका वर्षाच्या आत विवाह करणे बंधनकारक नसून, याबाबत समाजात असलेला गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील या चर्चित विवाहसोहळ्याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणाऱ्या या शाही विवाहसोहळ्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

