( मुंबई )
राज्याच्या राजकारणात सध्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे नरहरी झिरवाळ हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गुरुवारी रात्रीपासून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. या व्हिडिओमध्ये झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत असल्याचा दावा केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती पवन यादव नावाची ट्रान्सवुमन असल्याचे सांगितले जात असून, हे प्रकरण तिच्या भावाने उघड केल्याची चर्चा आहे. दरम्यान, पवन यादववर यापूर्वी कुरार पोलीस ठाणे येथे खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
व्हिडिओमध्ये शासकीय निवासस्थानी मद्यप्राशन आणि आक्षेपार्ह कृत्ये झाल्याचा आरोप करण्यात येत असल्याने प्रशासकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात असून, तो मुद्दाम आताच व्हायरल करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) ने ही संपूर्ण घटना झिरवाळ यांना अडकवण्यासाठी रचलेला कट असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, झिरवाळ यांनी स्वतः फोन करून हा व्हिडिओ एडिट करून तयार केल्याचा दावा केला आहे. “तीन-चार व्हिडिओ एकत्र करून चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले आहेत, असे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे त्यांनी तात्काळ तक्रार दाखल करावी, असा सल्ला मी दिला आहे,” असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, या व्हिडिओची सखोल चौकशी केली जाईल. “व्हिडिओची सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे आहे. जर आरोप खरे ठरले, तर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच या प्रकरणात त्यांच्या पक्षनेत्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या या व्हिडिओच्या सत्यतेबाबत स्पष्टता नसली तरी, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

