(रत्नागिरी)
पुणे शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असलेले सुरेश दिनकर कदम यांची लांजा उपविभागीय पोलिस अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली आहे. मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले कदम यांनी १९९५ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळवले होते.
मुंबईत पोलिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चार वर्षे विविध पोलिस स्थानकांत सेवा बजावली. त्यानंतर कोल्हापूर, रत्नागिरी शहर, जयगड यांसारख्या ठिकाणी त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. पोलिस उपनिरीक्षक पदावर असतानाच जिल्ह्यातील एका पोलिस स्थानकाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे ते पहिले अधिकारी ठरले होते. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सहायक पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाली.
सहायक पोलिस निरीक्षक म्हणून रत्नागिरी वाहतूक शाखा आणि नाटे पोलिस स्थानकात सेवा केल्यानंतर त्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. या पदावर त्यांनी जिल्हा विशेष शाखा, ग्रामीण पोलिस स्थानक, गोंदिया, पालघर, ठाणे ग्रामीण आणि भोईसर येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

